नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यात अवैध वाळूने उच्छाद मांडला आहे. त्यातच वाळूतस्करांना पाठबळ देणार्या पोलिस दलातील कर्मचार्यांच्या अब्रुचे आता वाळूतस्करच धिंडवडे उडवत आहेत. काल एक पोलीस निरीक्षक अन् आज एक कॉन्स्टेबल वाळूतस्करांच्या ‘कॉल रेकार्डिंग ट्रॅप’च्या जाळ्यात अडकला आहे. अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीसाठी लाचेची मागणी करणार्या संभाषणाची आज दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलीस दलातच खळबळ उडाली आहे.
नेवासा पोलीस स्टेशनच्या एका पोलीस अधिकार्याचे अवैध वाळू व्यवसाय करणार्या व्यक्तीबरोबर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने गुरुवारी दिवसभर पोलीस दलाची चांगलीच तारांबळ उडाली. त्या घटनेची दखल घेऊन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी कालच तत्काळ तडकाफडकी नियंत्रणकक्षात बदली करण्यात आली आहे. तसेच व्हायरल झालेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपची तातडीने चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले होते.
ते आदेश चौकशी करणार्या संबंधित अधिकार्यांपर्यंत पोचत नाहीत, तोवर पुन्हा एका पोलीस कर्मचार्यासोबत अवैध वाळूशी निगडीत संभाषणाची दुसरी ऑडिओ क्लिप आज नेवासे तालुक्यात व्हायरल झाल्याने पोलीस दल गांगरून गेले आहे. याची उत्तरे देताना नेवासे पोलीसांची दमछाक झाली आहे. त्या कर्मचार्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत आहे. नार्को टेस्ट केल्यास मोठा आर्थिक घोटाळा बाहेर येऊ शकतो. त्या कर्मचार्याच्या क्लिपमध्ये चालू महिन्याचे पैसे घेऊन या. मागील महिन्याचे पैसे दिलेले नाहीत. या पंधरा दिवसांत गाडी चालली, त्याचे कोण देईल? आठ आणि दहा हजार रुपयांचा काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा गाडी लावून देतो. उदया एखाद्या वकीलाकडून जामीन करून घे, अशा संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
दरम्यान, आज ही क्लिप कोणी व्हायरल केली? ते वाळूचे वाहन कोणाचे होते? समोरील बोलणारी व्यक्ती कोण? आणि हा पोलीस कर्मचारी नेमका कोण? याचीही चर्चा रंगली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात नेवासा पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल गर्जे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्यातील कथित सेटिंगबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेवासा तालुका व पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती.