कोल्हापूर – इचलकरंजी येथील एका बॅंकेच्या कॅश डिपॉझिटमध्ये मिळून आलेल्या बनावट नोटांच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी आंतरराज्य टोळीचा छडा लावला. बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील मुख्य संशयितांसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
आंबाजी शिवाजी सुळेकर (वय 42, रा. पासार्डे ता. करवीर), राजूभाई इस्माईल लवंगे (55 रा. कळंबा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन हजार, पाचशे, दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांच्या एकूण दहा लाख 54 हजार 400 रुपयांच्या बनावट नोटा आणि त्यासाठी वापरलेली साधनसामुग्रीही जप्त केली आहे. संशयितांनी कर्नाटकातही खपवलेल्या बनावट नोटांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.
या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, एका बॅंकेच्या कॅश डिपॉझिटमध्ये बारा दिवसांपूर्वी साडेचार हजारांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गतीने तपास सुरू केला.
यातील संशयित आयुब जमादारकडे कसून चौकशी केल्यानंतर एका व्यापाऱ्याचे नाव पुढे आले. कोल्हापुरातील आयुबचा मेव्हणा रिक्षाचालक उस्मान शेखकडून त्या बनावट नोटा आयुबकडे आल्याचे स्पष्ट झाले. शेखकडील चौकशीनंतर बनावट नोटा बनवण्यासाठी आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार कोल्हापूर, कळंबा आणि सांगरुळमध्ये संशयितांचा शोध सुरू केला.
संशयावरून आंबाजी सुळेकर याच्या सांगरूळ फाट्यावरील सुमन मोबाईल शॉपीवर छापा टाकला. तेथे बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरत असलेला संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि बनावट नोटा मिळून आल्या. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता कळंबे येथील किराणा दुकानदार राजूभाई लवंगेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटकातही तपास
मुख्य संशयित अंबाजी सुळेकरने बेळगाव येथील एका व्यक्तीकडून सहा लाखाच्या बनावट नोटा घेतल्या. त्या बदल्यात तीन लाखाच्या खऱ्या नोटा तो देणार होता. त्याने स्वतःच्या शॉपीतही नोटा छपाई करून कटिंगचे कामे सुरू केले. तो, कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यात बनावट नोटा खपवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कर्नाटकसह अन्य राज्यात तपास सुरू आहे.