राजकीय हालचालींना वेग; अपक्षही रिंगणात, शरद पवार यांची साताऱ्यात खलबते
सातारा – विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची राजकीय धुळवड आता रंगात येऊ लागली आहे. राष्ट्रवादी व भाजपच्या दिग्गज आयाराम उमेदवारांसह अपक्षांनीसुध्दा आपापले अर्ज दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील तर सातारा विधानसभेसाठी दीपक पवार, वाईमधून मकरंद पाटील, पाटणमधून सत्यजित पाटणकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
कराड दक्षिणमधून अतुल भोसले (भाजप), माणमधून जयकुमार गोरे (भाजप), कोरेगावमधून महेश शिंदे (शिवसेना) या दिग्गजांनी आज मोठे शक्तीप्रदर्शन करत आपापले अर्ज दाखल केल्याने जिल्हयाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. शिवसेनेचे बंडखोर पुरूषोत्तम जाधव यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुरूवारी संध्याकाळनंतर साताऱ्यात दाखल झाल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला.
जिल्हयात गुरुवारी पदयात्रा, रॅली आणि कोपरा सभांनी विधानसभा निवडणुकांच्या वातावरणाला रंग भरायला सुरवात झाली. दि 27 सप्टेंबर ते एक ऑक्टोंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची फारशी लगबग दिसून आली नाही. मात्र, गुरूवारचा दिवस जिल्हयाच्या राजकारणासाठी प्रचंड धावपळीचा ठरला. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दिग्गज उमेदवारांनी भव्य शक्तीप्रदर्शनाने अर्ज भरले.
साताऱ्यात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील व दीपक पवार यांनी अर्ज भरण्यापूर्वी गांधी मैदान ते पोवई नाका अशी दणकेबाज रॅली साताऱ्यातून काढली. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या पुरूषोत्तम जाधव यांनीसुद्धा भव्य शक्तीप्रदर्शनाने सातारा लोकसभसाठी अर्ज भरल्याने साताऱ्याची लढत तिरंगी होणार आहे. वाईमध्ये मकरंद पाटील यांची रॅली लक्षवेधी ठरली. समर्थकांच्या जल्लोषात पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला.
कराड दक्षिणमधून कॉंग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, भाजपकडून अतुल भोसले, कराड उत्तरमधून शिवसेनेचे धैर्यशील कदम, पाटणमधून राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकर यांनी कोरेगावमधून शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी, माणमधून भाजपचे जयकुमार गोरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.
शुक्रवार दि 4 रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कोरेगावातून आमदार शशिकांत शिंदे, पाटणमधून शंभूराज देसाई, कराड दक्षिणमधून ऍड. उदयसिंह पाटील, माणचे शेखर गोरे, वाईचे शिवसेनेचे बंडखोर पुरूषोत्तम जाधव याशिवाय कराड उत्तरमधून मनोज घोरपडे जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार आहेत.
जिल्हयाच्या कानाकोपऱ्यात कार्यकर्ते कामाला लावण्यासाठी नेत्यांची कोअर टीम कामाला लागली आहे. दि 5 रोजी अर्जांची छाननी व दि 7 रोजी अर्ज माघारी घ्यावयाची मुदत आहे. त्यानंतर जिल्हयाच्या अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. खरी लढत भाजप शिवसेना महायुती विरूद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी यांच्यातच होणार आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसाठी चार उमेदवारांचे सहा अर्ज
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज चार उमेदवारांनी सहा नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली. शिवाजी नारायण भोसले (अपक्ष), दीपक उर्फ श्री व्यंकटेश महास्वामीजी यांनी हिंदुस्थान जनता पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली. श्रीनिवास दादासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून पुरुषोत्तम बाजीराव जाधव यांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल केले.
आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये 42 अर्ज दाखल
विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज एकूण 42 नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी दिली. फलटण मतदारसंघात तीन, वाईत सहा, कोरेगावात तीन, माणमध्ये सहा, कराड उत्तरमध्ये एक, कराड दक्षिणमध्ये 13, पाटणमध्ये पाच व साताऱ्यात पाच नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
शरद पवार आज साताऱ्यात
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्यासाठी शरद पवार रात्री आठ वाजता साताऱ्यात दाखल झाले. महामार्गावरील प्रीती एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य होते. पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे व श्रीनिवास पाटील, दीपक पवार यांनी पवार यांची भेट घेतली. त्यानंतर कमराबंद खलबते पवारांनी केली. शुक्रवारी दुपारी रयतच्या शताब्दी सोहळ्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुन्हा बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग मिळण्याची शक्यता आहे.