पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला असून, महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत.
येत्या १० मे रोजी ही सभा होणार असून सभेचे ठिकाण लवकरच अंतिम होणार आहे, अशी माहिती भाजप उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपचे शहर उपाध्यक्ष श्याम देशपांडे, प्रशांत हरसुले, लहुजी क्रांती सेनेचे नितीन वायदंडे, प्रदेश प्रवक्ते संजय मयेकर आणि हेमंत लेले उपस्थित होते.
दरम्यान, ठाकरे यांच्या सभेसाठी शहर मनसेने पोलिसांना पत्र देत टिळक चौकातील (अलका टाॅकीज) जागेची मागणी करण्यात आली आहे. मनसेने या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पुण्यात राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भाजपला फायदा होणार असल्याने या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.
याबाबत पांडे म्हणाले, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी दि. ४ मेपासून “घर चलो’ अभियान सुरु करण्यात आले आहे. साडेसात हजार कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सभा आणि दौर्याचे नियोजन दि. ८ ते ११ मे दरम्यान करण्यात आले आहे.