पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विशेष मुलीवर बलात्कारप्रकरणी न्यायालयात पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून आरोपीने बलात्कार केल्याची दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपीला दोषी धरत दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी रागीट यांनी हा निकाल दिला.
प्रताप बबनराव भोसुरे (वय ५९ रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. ही घटना १८ मे २०१५ मध्ये घडली. पीडित मुलगी सकाळी ८ वाजता शेळ्या चारण्यासाठी रानात गेली होती. आरोपीने शेतातील पडीक जागेतील मंदिराजवळ पीडितेला गोळ्या खायला देतो, असे सांगून जवळ बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली असल्याचे पीडितेच्या आईने फिर्यादीत नमूद केले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या असक्षम असल्याने तिला इनकॅमेरा काही प्रश्न विचारण्यात आले होते. पीडित मुलीने खाणाखुणा आणि हातवारे करून तिच्यावर आरोपीने केलेल्या अत्याचाराची कहाणी स्पष्ट केली.
त्यामुळे न्यायालयात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हेमचंद्र बी. खोपडे यांनी तपास केला. कोर्ट पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार एस. बी. भागवत आणि पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ज्ञानदेव सोनावणे, तसेच कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत यांनी काम पाहिले.