-बाधितांच्या संपर्कातील ६ जणांना तपासणीसाठी पुण्याला रवाना -तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२ वर पोचली
वेल्हे (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या वडगाव झांजे येथील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील ६ जणांना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती वेल्हे प्रशासनाकडून मिळाली.
वडगाव झांजेमधील कोरोनावर ८ जणांनी मात करत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढत असल्याची आशादायक चित्र दिसत असताना शनिवारी (दि.२३) पुन्हा एकाच घरातील दाम्पत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पुणे येथील हॉस्पिटलमध्ये वेल्हे तालुक्यातील वडगाव झांजे परिसरातील एकूण १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाची साखळी तुटण्याची शक्यता वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने आपले तोंड वर केले आहे. शनिवारी आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३६ व ३२ वर्षीय पतीपत्नींचा समावेश असून त्यांच्याच घरातील आई, वडील, १२, १०, ८ वर्षांच्या तीन मुली व ६ वर्षाचा एक मुलगा अशा ६ जणांना कोविड तपासणीसाठी पुणे येथे रविवारी पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवकर यांनी सांगितले.
…अखेर ‘त्या’ मुलाचा अहवाल ‘निगेटिव्ह’
बाधित रुग्णांच्या संपर्कातील ३२ जणांचे स्वॅब बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते परंतु दुसऱ्या टप्प्यात पाठवलेल्या एका १२ वर्षाच्या मुलाचा अहवालच गहाळ झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ‘त्या’ मुलाची शुक्रवारी (दि.२२) पुन्हा एकदा स्वॅब काढून तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर संपूर्ण वेल्हे तालुक्याचे लक्ष ‘त्या’ मुलाच्या अहवालाकडे लागले होते. अखेर शनिवारी ‘त्या’ मुलाचा कोविड तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने वडगाव झांजेकरांना दिलासा मिळाला.