पिंपरी (प्रतिनिधी) – तीनचाकी टेम्पो आणि मोटारीच्या धडकेत टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी (दि. 24) दुपारी घडली.
मनोहर दौंडकर, सुमन दौंडकर (रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी जखमींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन पुढे जात असताना दोन्ही वाहने एकमेकांना धडकली. अपघातानंतर चालत्या टेम्पोतील दोघेजण रस्त्यावर पडले. ही धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर टेम्पो बीआरटी मार्गाच्या दुभाजकावर जाऊन पलटी झाला. तर, मोटार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर जोरात आदळली आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1222250368114666/
अपघातानंतर नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देत जखमींना रुग्णालयात हलवले. यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नव्हती. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.