कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात लाखोंचा जनसागर लोटला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच जिल्हा प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये 25 लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील अशा अंदाजाने नियोजन केले होते. प्रत्यक्षात अंबाबाई मंदिरात नवरात्रीमध्ये 23 लाख 31 हजार 604 भाविकांनी भेट दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.
देवस्थान समितीकडून ऑनलाईन दर्शनाची सुद्धा सोय करण्यात आली होती. या माध्यमातून 42 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. दुसरीकडे सप्तमीला अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीकडून 7 लाख 73 हजार 721 भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
तथापि, या आकड्यावरून मत मतांतरे आहेत. कारण तीन लाखांवर भाविक गेल्यानंतर कोल्हापूरमध्ये करण्यात आलेली 12 ठिकाणची पार्किंग व्यवस्था कोलमडली होती. शहरातील वाहतुकीवरही ताण निर्माण झाला होता. त्यामुळे त्या दिवशीच्या आकडेवारीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवामध्ये 13 लाख प्रसादाच्या लाडूंची विक्री झाली. अंबाबाईची नवमीला विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विश्वेश्वरी जगध्दात्रीच्या रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. गजानन मुनीश्वर आणि मुकुल मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली. गेल्या नऊ दिवसांपासून विविध रुपात अंबामातेची पूजा बांधण्यात आली.