राजकीय रणसंग्राम : आता उरले अवघे दोनच दिवस
वडगाव मावळ – मावळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 1) बहुजन समाज पार्टीतर्फे मंदाकिनी शशिकांत भोसले यांनी, आणि अपक्ष म्हणून धर्मपाल तंतरपाळे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. उद्या, बुधवारी (दि. 2) महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले आहेत.
शुक्रवारी (दि. 27) 11 नामनिर्देशन पत्राची, सोमवारी (दि. 30) 6 नामनिर्देशन पत्राची व मंगळवारी (दि. 1) 16 नामनिर्देशन पत्र अशी 33 नामनिर्देशन पत्र घेतली आहेत. मंगळवार (दि. 1) दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ- मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळचे तहसीदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
बुधवारी (दि. 2) महात्मा गांधी जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. आज मंदाकिनी भोसले यांनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने नामनिर्देशन पत्र, तर धर्मपाल तंतरपाळे यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. या वेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, आर. एल. कांबळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंगळवारी दिवसभरात दत्तात्रय गोदू शिंदे, बाबूलाल म्हातारबा गराडे, अतुल चंद्रकांत राऊत, विशाल वसंतराव वहिले, बाबुराव आबाजी वायकर, मुकेश मनोहर अग्रवाल, धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे, विलास सखाराम ढोरे, गोरख सुरेश जांभुळकर, रवींद्र आप्पा भेगडे, किरण शांताराम साळवे, गुलाब गोविंद म्हाळसकर, सुनील शंकरराव शेळके, सारिका सुनील शेळके, दीपक यशवंत लोहर, दादाभाऊ गबाजी ओव्हाळ अशा एकूण 16 नामनिर्देशन पत्र घेतले आहेत.