पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कधी नव्हे ते बारामती लोकसभेच्या निवडणुकीकडे यंदा संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. खुद्द शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होत आहे.
सुळे यांच्या विरोधात पवार कुटुंबीयांमधीलच उमेदवार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. मागील 15 दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या प्रचाराच्या मुलुखमैदानी तोफा रविवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. त्यामुळे आता पुढील काही तास छुपा प्रचार सुरू होणार आहे.
बारामती निवडणुकीसाठी दि.12 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तर दि. 22 एप्रिल रोजी अंतिम उमेदवारी निश्चित होऊन प्रचार सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यावर ही निवडणूक होत असल्याने ती लक्षवेधीच ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा अजित पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आमनेसामने ठाकल्या आहेत.
पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली, तर सुळे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने सभा घेतल्या. यामध्ये शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या, तसेच शरद पवार यांनी सहाही विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. पहिल्यांदाच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट निवडणूक होत आहे.
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडून वातावरणात खऱ्या अर्थाने रंग भरला. यंदाच्या प्रचारात स्थानिक प्रश्न, समस्यांवर चर्चा झाली नाही. देशपातळीवरील प्रश्न, विकासाचे मुद्दे, सरकारचे विविध प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, यावरच प्रचाराचा भर राहिला. राजकीय पक्षांच्या नेत्यांना पायाला भिंगरी लावून फिरावे लागले, तसेच कमी कालावधीत अनेक सभा घेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या वापर देखील मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पाहायला मिळाले.
आता जागता पहारा
रविवारी सायंकाळी अधिकृत प्रचार समाप्त होत असला, तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरूच राहणार आहे. मतदान दि. 7 मे रोजी होणार आहे. मतदारांपर्यंत व्होटर स्लीप पोहोचल्या आहेत किंवा नाही. मतदानासाठी पोलिंग एजंट नेमणे, बूथ उभारणे व याठिकाणी राबणाऱ्या तळातील कार्यकर्त्यांसाठी नाश्तापाण्याची व्यवस्था करणे. फोडाफोडीचे राजकारण, नाराजांचे मन वळविण्याचा प्रयत्न अणि याहून अगोदरच्या रात्री आपली हक्काची मते राखण्यासाठी कार्यकर्त्यांना जागता पहारा द्यावा लागणार आहे.