पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील बारामती मतदसंघासाठी मंगळवार (दि.7) रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात 23 लाख 72 हजार मतदार असून, एकूण 2 हजार 516 मतदान केंद्र आहेत. तर, सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान करता येणार आहे. मतदानाच्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.
या बाबतची माहिती देण्यासाठी विधानभवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट देण्यात आले आहे. मतदानासाठी मोठी रांग असेल, तर प्रतिक्षा हॉल उपलब्ध असतील. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असतील, तर तेथे मांडव टाकण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट असेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे मतदान केंद्रात फुल देऊन स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती द्विवेदी यांनी दिली.
ईव्हीएमची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम मशीनचे वाटप केले जाणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे सोमवारी अंतिम प्रशिक्षण घेतले जाणार असून त्यानंतर कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होतील. निवडणुक कर्मचारी-अधिकारी यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या
विधानसभा – पुरुष – महिला – एकूण
दौंड – 1,57,813 – 1,46,783 – 3,04,607
इंदापूर – 1,67,483 -1,56,046 -3,23,541
बारामती- 1,88,490 – 1,80,707 -3,69,217
पुरंदर – 2,24,905 – 2,04,416 -4,29,351
भोर – 2,16,932 -1,90,985 – 4,07,921
खडकवासला – 2,86,322 – 2,51,670 – 5,38,031
एकूण – 12,41,945 -11,30,607 -23,72,668
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र व कर्मचार्यांची संख्या
विधानसभा – मतदान केंद्र – कर्मचारी संख्या
दौंड – 309 – 2,597
इंदापूर – 330 -2,518
बारामती – 380 -3,500
पुरंदर – 421 – 3,377
भोर – 561 – 4,062
खडकवासला – 465 -4,049
निवडणुकीसाठी आवश्यक कर्मचारी – सुमारे 20 हजार
– पोलीस बंदोबस्तासाठी 8 हजार 509 कर्मचारी
– राज्य राखीव दलाच्या आठ तुकड्या
– केंद्रीय पोलीस दलाच्या 12 तुकड्या
– होमगार्ड -2 हजार 81
मतदान साहित्याचे येथून होणार वाटप
दौंड : शासकीय धान्य गोदाम, दौंड
इंदापूर : शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, इंदापूर
बारामती : वखार महामंडळ, औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर, बारामती
पुरंदर : श्री कातोबा हायस्कूल दिवे
भोर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर
खडकवासला : स्प्रिंग डेल प्ले ग्राऊंड, वडगाव बु. ता. हवेली
वेल्हे तालुका : जुनी पंचायत समिती इमारत, व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द,
मुळशी तालुका : राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली,