रणसंग्राम
युती, वंचित, एमआयएमचेही उमेदवार जाहीर; आघाडीचे मात्र तळ्यात-मळ्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील महायुतीचे तीनही मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाल्याने आज शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याने महायुती जोमात असल्याचे चित्र पहावयास मिळाले. युतीसोबतच वंचित आणि एमआयएमचे उमेदवार जाहीर झाले असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मात्र अद्यापही तळ्यात मळ्यातच सुरू आहे.
इच्छुकांना कोणताच संदेश दिला जात नसल्याचे त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात गेल्याचेच चित्र पहावयास मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे 20 दिवस शिल्लक राहिलेले असतानाच शिवसेना-भाजपाने अंतर्गत मतभेद संपुष्टात आणत युती जाहीर केली. तर दुसऱ्याच दिवशी आपले उमेदवारही जाहीर केले. तर आजच वंचित आघाडीचेही शहरातील दोन उमेदवार जाहीर केले आहेत.
एमआयएमचाही उमेदवार जाहीर झालेला असतानाच कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मात्र जाहीर झालेले नाहीत. पिंपरी-चिंचवड शहर हे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र आज हा बालेकिल्ला नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
राष्ट्रवादीची शहरात झालेली वाताहात रोखण्यासाठी यावेळी सर्वांत अगोदर या पक्षाचे उमेदवार जाहीर होतील, असे बोलले जात होते मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाही उमेदवार अंतिम झालेले नाहीत. उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने इच्छुकांसह या पक्षाचे कार्यकर्तेही सैरभैर झाल्याचे पहावयास मिळत आहे. निष्ठावंतांऐवजी आयारामांवर भर देण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे पक्षात नाराजीही निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.