पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन कोर्स तयार केले आहेत. हे कोर्सेस स्वयंम या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
यासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने सर्व संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. या आॅनलाईन अभ्यासक्रमांमध्ये अकाऊंटन्सी, बिझनेस स्टडीज, बायोलॉजी, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, भूगोल, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, सायकोलॉजी, इंग्लिश आणि सोशियोलॉजी यासह 11 विषयांचा समावेश आहे. अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरू असून येत्या 1 सप्टेंबर 2024 रोजी लिंक बंद होईल.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेले स्वयंम प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांसाठी शिकण्याच्या संधी वाढविण्यासाठी डिझाइन केलेले ऑनलाइन व्यासपीठ आहे. देशातील सर्वात नामांकित शिक्षकांनी तयार केलेले अभ्यासक्रम आहेत. तसेच हे कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत.