पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामती मतदारसंघासाठी जाहीर प्रचाराची मुदत संपली असली, तरी आता मतदानाच्या दिवसापर्यंत फेसबुक, व्हाटसअॅप, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि युट्यूब आदी सोशल मीडियातून प्रचाराचा धुमाकूळ घातला जाण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियातील मेसेज, तसेच माहितीवर कोणत्याही स्थितीत नियंत्रण ठेवले शक्य नसल्याने उमेदवारांचा प्रचार आता या माध्यमातून पुढील काही तास केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या काही वर्षांत देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यातही प्रामुख्याने व्हॉट्स अॅपद्वारे मोठ्या प्रमाणात मेसेजची देवाणघेवाण होत आहेत.
त्यातच ग्रुप किंवा ब्रॉडकास्टद्वारे एकाच वेळी शेकडो जणांशी संवाद साधता येत असल्याने माहितीच्या देवाणघेवाणीसाठी प्रचारासाठी प्रचंड वापर होत आहे. याचाच फायदा घेत उमेदवारांची माहिती, पत्रके, वोटर स्लीप अशी माहिती लिंकच्या स्वरूपात पाठविण्यात येत आहे. त्यामुळे एका बाजूला जाहीर प्रचार बंद झाला, तरी दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरच्या प्रचाराने धुरळा उडणार हे नक्की आहे.