“करोना’चा प्रादुर्भाव : दहा दिवसांत एकालाही लागण नाही
साडेपाच लाख नागरिकांचे सर्वेक्षण : केवळ तीन रुग्ण उपचाराधीन
पिंपरी – जगभरात “करोना’ थैमान घालत असताना पिंपरी-चिंचवड शहर मात्र “करोना’मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सुरुवातीच्या काळात सर्वाधिक रुग्ण असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आता अवघे तीन करोना बाधित रुग्ण उरले आहेत. सलग दहाव्या दिवशी एकही “करोना’बाधित रुग्ण आढळलेला नाही. 12 मार्च ते 20 मार्च या काळात शहरात 12 करोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र प्रशासन आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनी या आजाराला ब्रेक लावला. 12 पैकी 9 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत, तर उर्वरित तीन रुग्णांची प्रकृतीही स्थिर आहे. दरम्यान एकही रुग्ण दगावलेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी व वायसीएम रुग्णालयात सोमवारी 21 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. “करोना’ विषाणूच्या तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्राव पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. तसेच शहरात आजअखेरपर्यंत साडेपाच लाख नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील 3 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना भोसरी व वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. “करोना’ विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजअखेर 5 लाख 48 हजार 627 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 1463 नागरिकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आढळली तर तात्काळ नजीकच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, होम क्वॉरंटाइन केलेल्या नागरिकांना सक्तीने चौदा दिवस घरातच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या पथकाच्यावतीने नजर ठेवण्यात येत आहे. तसेच होम क्वॉरंटाइनचे उल्लंघन केल्यास त्यांना सहा महिन्यांची शिक्षा केली जाणार आहे.