पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घरफोडीचे दीडशेहून अधिक गुन्हे दाखल असलेला चोरट्यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघड झाले असून, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड (३८, रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक चोरट्याचे नाव आहे. गायकवाड याच्याविरुद्ध घरफोडीचे दीडशेहून अधिक गुन्हे दाखल आहेत. शहरातील मध्य भागात झालेल्या घरफोडीचा तपास विश्रामबाग पोलिसांकडून करण्यात येत होता.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले, तेव्हा गायकवाडने घरफोडी केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तपासात त्याने घरफोडीचे दोन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
त्याच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठाेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, सहायक फौजदार राकेश गुजर, रेवण कंचे, अशोक माने, मयूर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, अर्जुन थोरात यांनी ही कारवाई केली.