जाधववाडी – संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर सर्व गोष्टींची विक्री करण्यास बंदी आहे. परंतु जाधववाडीत कॉलन्यांतर्गत रस्त्यावरील सर्वच्या सर्व टपऱ्यांमधून आहोरात्र तंबाखू, गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
लॉकडाऊनमुळे सर्वत्र असे पदार्थ विक्री करणे बंद असताना अगदी सहजपणे ह्या टपऱ्यांवरती या वस्तू मिळत आहेत. ह्या टपऱ्यांमधून काही प्रमाणात दूधविक्री केली जाते. त्यामुळे लॉकडाऊन असतानाही त्यांना टपरी उगडी ठेवण्यास परवानगी आहे. कारण दूध हे जीवनावश्यक आहे. परंतु त्याचा फायदा हे टपरीचालक वेगळ्या बाजूने उचलताना दिसत आहेत.
दुधाबरोबरच तंबाखू, गुटखा अशा पदार्थांचीदेखील मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. सर्वत्र ह्या पदार्थांची विक्री करण्यास बंदी असल्याने अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये ही विक्री करून नागरिकांची लूट केली जात आहे. परंतु परिसरात नागरिकांकडून विविध प्रश्न विचारले जात आहेत. यांना गुटखा विक्रीची परवानगी कशी मिळते? ह्यांना गुटखा विक्रीची परवानगी कोणी दिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉकडाऊनमध्ये मोठे आर्थिक नुकसान अनेकांना सोसावे लागत आहे. अनेकांची दुकाने भाड्याची असल्याने अनेकांनी नुकसान स्वीकारले असून काही जण आपल्या व दुसऱ्यांच्या जिवाशी खेळत आहेत.
करोनाचा प्रसार होण्यास मदत
काहीजण गुटखा विकत आहेत. परंतु खाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. त्यांचीही तलफ भागवली जात आहे. तंबाखू, गुटखा चघळणारे वाटेल तिथे थुंकत असल्याने करोनाचा प्रसार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.