निर्णायक मतांसाठी उमेदवारांचा कस

सुरेश डुबल
कराड – जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. या निवडणुकीत आपणच जिंकणार, असे प्रत्येक उमेदवाराला वाटू लागले आहे. मात्र या निवडणुकीत नव मतदारांचा टक्का वाढलेला आहे. त्यामुळे हा नवमतदारांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार? हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

राज्यात विधानसभेची धामधूम सुरु असून प्रचारासाठी अवघे पाच दिवस उरले आहेत. प्रत्येक निवडणुकीवेळी नव मतदार यांची संख्या वाढत असते. त्यामुळे या नवमतदार युवकांना मतदानाबाबत कमालीची उत्सुकता असते. 18 वर्षे पूर्ण केलेल्या या नव मतदारांच्या मागण्याही साध्याच असतात.

बेरोजगारांना रोजगार मिळावा, आपल्या मतदारसंघात रस्ता, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य या सुविधा लोकप्रतिनिधींनी राबवाव्यात. आपला मतदार संघ सर्वगुणसंपन्न व्हावा, ही माफक अपेक्षा त्यांची असते. त्यामुळे या निवडणुकीत कोणते उमेदवार या युवकांना काय आश्‍वासन देतात, यावर नव मतदारांचे कल अवलंबून आहेत. वयाच्या अठराव्या वर्षी हे नवमतदार साधारणत: बारावी पास होऊन पुढील शिक्षण घेत असतात.

त्यांना जगात सुरु असलेल्या घडामोडी इंटरनेटच्या माध्यमातून समजू लागल्या आहेत. त्यामुळे यांना खोटी आश्‍वासने देऊन फसवणारे लोकप्रतिनिधी चांगलेच माहीत असतात. जुन्या काळात मतदार पक्ष बघून मतदान करत होता. आता मात्र काळ बदलला आहे. आपला विकास कसा होईल, आपला लोकप्रतिनिधी कोण असावा, त्यांच्याकडून लोकहितवादी कामे होतील की नाही, ही जाण नव मतदारांना आली आहे. मात्र यातील काही नवमतदार हे मतदारसंघात क्रेझ असलेल्या उमेदवारांकडे देखील आकर्षित होत आहेत.

सोमवारी 21 तारखेला होणाऱ्या विधानसभेसह लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी मतदारांना कसे प्रभावित करता येईल, यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. या मतदारांमध्ये यंदा नव मतदारांचा टक्का वाढलेला आहे.

या निवडणुकीत अटीतटीचे सामने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात होणार असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे येथे एका एका मताला महत्त्व आलेले आहे. यामुळेच या नव मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवारांनी प्रयत्न सुरु केले आहेत. हे नवमतदार कोणाच्या मागे जातील, हे निवडणुक निकालानंतर समजेल.

उमेदवारांसोबत सेल्फीसाठी झुंबड
या आधीच्या निवडणुकांमध्ये नव मतदारांना भेटण्यासाठी कोणताही उमेदवार शाळा-महाविद्यालयात गेलेला नव्हता. या निवडणुकीत मात्र शाळा-महाविद्यालयांमध्ये बऱ्याच लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या आहेत. या संवादादरम्यान आपला अजेंडाही त्यांनी स्पष्ट केला आहे. या निवडणुकीत नव मतदारांचा उस्फूर्त प्रतिसादही उमेदवारांना पहावयास मिळाला. उमेदवारांबरोबर सेल्फी काढण्यासही हे नवमतदार पुढे होते. यांनी सेल्फी काढला खरा, पण यांची मते कोणाच्या पथ्यावर पडतील यावरच त्या-त्या उमेदवारांचा विजय अवलंबून आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)