जयंत पाटील यांनी सर्वसामान्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले

निशिकांत पाटील यांचा आरोप 

इस्लामपूर – देश स्वातंत्र्य होऊन आज 72 वर्षे झाली, राजारामबापूंच्या नंतर सुसंस्कृत समजणाऱ्या नेतृत्वाला तालुक्‍यातील जनतेने हाताच्या फोडाप्रमाणे जपले. पण या नेतृत्वाने जनतेचेच स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप जयंत पाटील यांच्यावर इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांनी केला. हुबालवाडी, खरातवाडी, रेठरेहरणाक्ष गावात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, राजारामबापूंच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे नेतृत्व मोठ्या विश्वासाने तालुक्‍यातील जनतेने स्वीकारले. बापूंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतील, सर्वसामान्यांचे जिवनमान उंचावतील, उसाला चांगला दर देतील, प्रत्येकाला आदर, सन्मानाची वागणूक मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र या नेतृत्वाने माणसात माणूस ठेवला नाही. उसाला रास्त भाव दिला नाही व दिलेला भाव वेळेतही दिला नाही.

कपातीची कुऱ्हाड ऊस उत्पादकांवर नेहमीच ठेवली. यामुळे कष्टकरी ऊस उत्पादक आज अर्थिक संकटाशी दोन हात करत आहेत. हे सर्व बदलण्याची हीच वेळ असून कोणत्याही अमिषाला, दमबाजीला बळी न पडता मतदारांनी स्वाभिमानाने लोकशाहीच्या मार्गाने मतदान करावे.

प्रसाद पाटील, चंद्रकांत पाटील, धैर्यशील मोरे, दादा रसाळ, संदीप सावंत, अधिक मोरे, मधुकर हुबाले, तानाजी हुबाले, शरद अवसरे यांनी परिवर्तनाला साथ करा असे आवाहन केले. यावेळी जगन्नाथ मोरे, एन. डी. माने, पोपट पवार, रवींद्र पिसाळ, संजय हुबाले, सुनिल फुलारे, शिवाजी हुबाले, सतिश हुबाले, बाळासो फुलारे, अजय हुबाले, शुभम हुबाले, माणिक पाटील, विजय मोरे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.