पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ऑनलाइन ट्रेडिंगचा व्यवसाय असून, त्यात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एकाने पती पत्नीसह चार जणांची २ कोटी २९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार बालेवाडी परिसरात घडला आहे.
याप्रकरणी समाधान शंकर कदम (४५, रा. बालेवाडी) यांनी चतुःशृंगी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश भास्कर टिळे (रा. परफेक्ट १०, बालेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मे २०२३ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे. फिर्यादी समाधान कदम बाणेर येथील नेटसर्प कम्युनिकेशन येथे ऍडमिन हेड आहे.
फिर्यादी समाधान कदम आणि निलेश टिळे हे जुने मित्र आहेत. एक वर्षांपूर्वी मधुबन सोसायटी येथे कदम आणि टिळे भेटले हे भेटले. या वेळी निलेश टिळेने तो शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करत असल्याचे फिर्यादी समाधान कदम यांना सांगितले. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो, असे त्याने सांगितले. जवळचा मित्र असल्याने फिर्यादी समाधान कदम यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, तसेच फिर्यादी समाधान कदम यांनी पत्नी आणि मित्रांना निलेश टिळे याच्याकडे गुंतवणूक करायला सांगितले.
यानंतर फिर्यादी समाधान कदम यांनी वेळोवेळी बचत, मित्रांकडून हात उसने आणि वडिलोपार्जित सोने विकून १ कोटी ८१ लाख ९५ हजारांची आरोपी निलेश टिळे याच्याकडे गुंतवणूक केली, तसेच समाधान कदम यांच्या पत्नीने २५ लाख, मित्र रणजित कदम यांनी १० लाख, दुसरा मित्र अजय कुमार यांनी १५ लाखांची गुंतवणूक केली आहे.
गुंतवणुकीनंतर निलेश टिळे याने पहिले दोन तीन महिने गुंतवणुकीवर चांगला नफा दिला. त्यानंतर पैसे देणे बंद केले. याबाबत फिर्यादी समाधान कदम यांनी टिळे याच्याकडे विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या मित्राकडे निलेश टिळेसंदर्भातील चौकशी केली असता त्याने याप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे लक्षात आले.
यानंतर निलेश टिळे याने फिर्यादी कदम यांना तुमचे पैसे बुडाले असून, ते मी देऊ शकणार नाही, म्हणत कोणाला सांगायचे ते सांगा. कुठेही तक्रार करायची ते करा, मी पैसे देणार नाही, असे सांगितले. यानंतर समाधान कदम यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करत आहेत.