पिंपरी – संचारबंदीच्या सुरवातीच्या दोन दिवसात एकही गुन्हा दाखल झालेला नव्हता. आता मात्र चोरट्यांनी संचारबंदीच्या काळात पुन्हा आपले डोके वर काढले आहे. दिघीमध्ये भरदिवसा अवघ्या अर्धा तासात चोरीची तर काळेवाडीतील एका मॉलच्या पार्किंमधूनही भरदिवसा दुचाकी चोरीस गेली आहे. यामुळे संचारबंदीच्या काळातही चोरट्यांची धूम कायम असल्याचे दिसून येते.
पहिली चोरीची घटना सोमवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान दिघी येथे घडली. पिंटू बाबू डाकवा (वय 33, रा. गायकवाड नगर, दिघी) यांनी मंगळवारी (दि. 31) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निजाम हैदर शेख (वय 19, रा. गायकवाड नगर, दिघी) या चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डाकवा यांचे घर सोमवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान बंद होते. त्यावेळी चोरटा निजाम याने त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आतील 11 हजार रुपयांचा मोबाईल व दोन सीमकार्ड चोरून नेले. पोलीस नाईक आव्हाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.
चोरीची दुसरी घटना काळेवाडी येथे मंगळवारी (दि. 31) दुपारी एक ते दोन वाजताच्या दरम्यान घडली. राकेश दिनदयाळ अग्रवाल (वय 42, रा. साई कॉलनी, काटे वस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यवाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अग्रवाल यांची 35 हजार रुपये किंमतीची एमएच-14-ईजे-5786 ही दुचाकी काळेवाडी येथील डी मार्टच्या पार्किंगमध्ये मंगळवारी दुपारी एक वाजता पार्क केली. एक तासाने ते जीवनावश्यक वस्तू खरेदी करून पुन्हा पार्किंगमध्ये आले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. महिला पोलीस उपनिरीक्षक सपना देवतळे याबाबत अधिक तपास करीत आहेत.