पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सिंहगड रस्ता परिसरातील एका डॉक्टरांच्या बंगल्यात चोरी केली असून, ४४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. त्यामध्ये ६० हजारांची रोकड, सोने-चांदी आणि हिर्यांच्या दागिन्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी चंद्रकांत मधुसूदन आठल्ये (६८, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ ते २८ एप्रिलच्या दरम्यान घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत आठल्ये आणि कुटुंबीय हे सुट्टीनिमित्त बंगल्याला कुलूप लावून आपल्या शेतातील घरी मुक्कामासाठी गेले होते.
त्या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंगल्याच्या मागील असणार्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला आणि कपाटाच्या ड्रॉव्हरचे लॉक तोडून त्यातील सोने चोरले, तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ४४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निकम करत आहेत.
Remarks :