मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून २ जुलै रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इथर ८ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक उलथा-पालथी झाल्या दरम्यान, आता आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस त्यावेळी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लागवल्याचे पाहायला मिळाले.
आजपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सभागृहाचे कामकाज सुरू झाले होते. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जागेवर उभे राहात नव्या मंत्र्यांची माहिती सभागृहाला द्यायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी पहिलेच नाव अजित पवार यांचे घेतल्यामुळे त्यावर विरोधी बाकांवरून काहीतरी प्रतिक्रिया येणार हे सर्वांनाच अपेक्षित होते आणि सभागृहात अपेक्षेप्रमाणेच घडले.
एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचा परिचय करून देताना “उपमुख्यमंत्री व वित्त” असा उल्लेख केला आणि ते थांबले. त्यांनी पलीकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिले. हे पाहून बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना “नाव सांगा”, असे म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचे नाव घेतले.
यानंतर अजित पवारांनी उभं राहात सगळ्यांना नमस्कार करून अभिवादन केले. अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किल शब्दांत टोला लगावला. “त्यांची-आमची जुनी ओळख आहे”, असे जयंत पाटील म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. तशीच ती अजित पवारांच्या चेहऱ्यावरही दिसून आली.
अजित पवारांनंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटातील इतर मंत्र्यांचाही परिचय सभागृहाला करून दिला. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल पाटील या नव्या मंत्र्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी घेतली.