पृथ्वीबाबांमुळे आघाडीची वाईट अवस्था

मुख्यमंत्री असताना कामे न केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची टीका

आधे इधर, आधे उधर, बाकी मेरे पिछे…

अतुलबाबांनी आवाज दिला की, 20 हजार लोक येतात. मात्र माजी मुख्यमंत्र्यांची अवस्था “आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे’अशीच झाली आहे, त्यामुळे त्यांच्या मागे आता लोक उरलेले नाहीत. 

कराड – माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा जास्त निधी आमदार नसताना डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आणला आहे. सत्तेत असताना पृथ्वीराजबाबा यांनी कामे न केल्यामुळे त्यांच्यासह आघाडीची वाईट अवस्था झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर महाजनादेश यात्रेच्या सातारा जिल्ह्यातील सांगता सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप कार्यकारिणी सदस्य भरत पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महायुती सरकारची कामगिरी सांगायला महाजनादेशच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायला आलो आहे. विधानसभेचा निकाल पक्का आहे. विधानसभेत पुन्हा भाजप महायुतीचा विजय होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कराड दक्षिणमध्ये आपल्याला यावेळी चूक करायची नाही. सातारा जिल्ह्यात परिवर्तन करून दाखवायचे आहे. यावेळेस प्रत्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या सोबत आहेत. यामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. मागच्या वेळेस अतुलबाबा एकटे होते. मात्र आता महाराजांचा फोर्स देखील अतुलबाबांच्या पाठीशी आहे. अतुलबाबांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्‍मिणी समितीचे अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी निस्वार्थपणे सेवा केली आहे. यामुळे यावेळी अतुलबाबांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही.

ना. फडणवीस म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी महाराष्ट्राचा आरोग्यामध्ये सहावा तर शिक्षणामध्ये 13 वा क्रमांक होता. त्यांना एकही काम पूर्णत्वाकडे नेता आले नाही. त्यामुळे तुम्हाला पायउतार व्हावे लागले. सातारा जिल्ह्यातील एकही सिंचन प्रकल्प तुम्हाला पूर्ण करता आला नाही. त्या सर्व सिंचन प्रकल्पाला आम्हाला निधी द्यावा लागला. माहितीच्या अधिकाराखाली रोजगाराची आकडेवारी मागूनही मिळत नाही, असे म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट मला विचारावे. मी त्यांना आकडेवारी सांगतो. 58 लाख 81 हजार 789 रोजगारांची निर्मिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे. 1 लाख 63 हजार 159 कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यातून कित्येक कोटींत रोजगार निर्मिती झाली आहे. देशामध्ये जितकी रोजगार निर्मिती झाली आहे. त्यामध्ये 25 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राने घेतला आहे.

मात्र तुमचे सरकार असताना तुम्हाला घेता आले नाही. ज्या यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने तुम्ही राज्य केले. त्यांच्या समाधीस्थळानजीकची भिंत तुम्हाला बांधता आली नाही. ती बांधण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागला. हे जर तुमचे कर्तृत्व स्पष्ट असेल तर तुम्हाला तुमची जागा जनता नक्की दाखवेल. ना. डॉ. अतुल भोसले म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप महायुती सरकारने कराड दक्षिणला भरभरून निधी दिला आहे. मुख्यमंत्र्याकडे जेवढी कामे मागितली, तेवढी कामे त्यांनी मंजूर केली.

मुख्यमंत्री फडवणीस यांनी 1176 कोटी 88 लाख 97 हजार रुपयांचा निधी आजपर्यंत कराड दक्षिणला दिला आहे. मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1800 कोटी रुपयांची कामे केल्याचे फलक लावत आहेत. एका फलकावर 550 कोटीची विकासकामे केल्याचा उल्लेख आहे. मात्र यातील यातील फक्त 48 कोटी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आणले आणि उर्वरित निधी हा मोदी सरकारने दिला आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय त्यांनी घेऊ नये. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड दक्षिणसाठी मंजूर केलेल्या विकासकामांचे उद्‌घाटन सध्या माजी मुख्यमंत्री करत आहेत. या कामांच्या तांत्रिक बाबी पूर्ण नसताना ही उद्‌घाटने अनधिकृतपणे करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम ते करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.