भीमसृष्टीमधील म्युरल्स माहितीपटात त्रुटी!

प्रकल्प उठाव शिल्पात चुकीचा मजकूर : उद्‌घाटन होत नाही तोच तक्रारी उघड

पिंपरी  – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्याच्या माहितीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात “भीमसृष्टी’च्या रूपाने साकारली. मात्र, या प्रकल्पाचे उद्‌घाटन होऊन काही दिवस उलटत नाही तोच यातील त्रुटी समोर आल्या आहेत. भीमसृष्टी प्रकल्पातील 19 पैकी 13 म्युरल्सच्या माहितीपटातील मजकुरामध्ये त्रुटी असल्याची बाब नागरी हक्‍क सुरक्षा समितीने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात नव्याने विकसित केलेल्या भीमसृष्टी प्रकल्पाचे 11 सप्टेंबर रोजी उद्‌घाटन झाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. परंतु महापालिकेने साकारलेल्या या प्रकल्पातील म्युरल्सच्या माहितीपटातील त्रुटी असल्याची बाब नागरी हक्‍क सुरक्षा समितीच्या वतीने महापालिकेच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भीमसृष्टी ही नागरिकांसह देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही नागरी हक्‍क सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 13 सप्टेंबर रोजी भीमसृष्टी प्रकल्पाची संयुक्‍त पाहणी केली.

त्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या 19 पैकी सोबत जोडलेल्या 13 म्युरल्सच्या माहितीपटातील मजकुरामध्ये काही त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. त्यामध्ये इतिहास काळातील प्रसंग, घडामोडी, तारखा, सनावळी, संत-महापुरुष, विशेष व्यक्ती, संस्था यांचा उचित गौरव, पदवी-सन्मान, कालानुक्रमाने घटनाप्रसंग याचा सुसंगतपणे अर्थ लागत नाही, अशा चुकांची आपण गंभीरपणे दखल घेऊन स्वतः या ठिकाणी पाहणी करून योग्य दुरुस्ती करण्यात यावी.

याशिवाय समितीच्या वतीने त्रुटींबाबतचा सविस्तर खुलासा करण्यात आला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सद्यस्थितीमध्ये व भविष्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी, छत्रपती संभाजी महाराज सृष्टी, छत्रपती शाहू महाराज सृष्टी, महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सृष्टी प्रकल्पामध्ये अशा त्रुटीं राहू नयेत याची दक्षता घ्यावी अन्यथा सत्य इतिहासाची मोडतोड केल्याप्रकरणी समितीच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा समितीने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या भीमसृष्टी प्रकल्पातील उठाव शिल्पांच्या माहितीपटातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांचा व कार्याचा चुकीचा प्रचार व प्रसार पर्यटकांच्या नजरेसमोर ठेवण्यात आला आहे. त्या माहितीची तातडीने दुरुस्ती करावी.

– गिरीश वाघमारे, सचिव, नागरी हक्‍क सुरक्षा समिती, पिंपरी-चिंचवड.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)