भाजप कार्यालयात तयारी; मात्र, 2 पराभवांनंतर शुकशुकाट
पुणे – शहरातील आठही मतदार संघ भाजपच्याच ताब्यात येणार, असे वाटल्याने जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या “सन्मान’ या हंगामी पक्ष कार्यालयात विजयोत्सवाची तयारी सकाळपासूनच सुरू होती. मात्र, हडपसर आणि वडगावशेरीतील दोन जागा भाजपला गमवाव्या लागल्याने या कार्यालयात विजयोत्सव झालाच नाही. त्यामुळे येथे अक्षरश: शुकशुकाट झाला.
केळीची खुंटं, झेंडूची फुले, पाने लावून कार्यालात सकाळपासून सजावट करण्यात आली होती. तेथे मोठा स्क्रीन लावून, निवडणुकीचे स्कोर पाहण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. याठिकाणी जल्लोष, कार्यकर्त्यांची गर्दी होईल, या हेतूने पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. मात्र हडपसर आणि वडगावशेरी या दोन ठिकाणचे निकाल आले आणि येथे शुकशुकाट झाला.
सकाळी साडेनऊ, दहा वाजण्याच्या सुमाराला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याठिकाणी आले. काहीवेळ थांबून ते मुंबईकडे रवाना झाले. निकाल लागल्यानंतर विजयोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली. खासदार गिरीश बापट यांनीही येथे स्क्रीनवर निवडणुकीचा लाइव्ह स्कोर पाहिला.
महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी यांनी याठिकाणी भेटही दिली. परंतु कोणीही उमेदवार त्यानंतर याठिकाणी फिरकला नाही. जे जिंकले त्यांनी त्यांच्या मतदार संघात जल्लोष साजरा केला.
संध्याकाळी 5 वाजता चंद्रकांत पाटील आल्यानंतर हा जल्लोष साजरा करणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र पाटील सायंकाळी साडेसात पावणेआठच्या सुमाराला शहरात दाखल झाले. ते थेट त्यांच्या मतदार संघात गेले आणि त्यांनी तेथे जल्लोष केला. मुक्ता टिळक यांनी टिळक पुतळा, महात्मा फुले पुतळा यांना पुष्पहार अर्पण करून न. चिं. केळकर रस्त्यावरील टिळक वाड्यासमोर विजयोत्सव साजरा केला.