वडोदरा – लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गुजरातच्या वडोदरा मतदारसंघाची विशेष चर्चा आहे. पक्षाचे येथील उमेदवार हेमांग जोशी हे त्याचे कारण आहे. ३३ वर्षीय जोशी यांना भारतीय जनता पार्टीने येथून उमेदवारी दिली आहे. वडोदरा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या २६ वर्षांत येथे कोणत्याही निवडणुकीत पक्षाचा पराभव झालेला नाही. लोकसभेच्या सलग सात निवडणुका पक्षाने जिंकल्या आहेत.
१९८८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचा येथे दबदबा निर्माण झाला. १९९१ च्या निवडणुकीत रामायण या दूरदर्शनवरील मालिकेत सीतेची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या दीपिका चिखलीया यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर १९९६ आणि पुन्हा १९९८ मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.
मोदींचाही मतदारसंघ
२०१४ ची लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन लोकसभा मतदारसंघांतून लढवली होती. उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि दुसरा मतदार संघ होता वडोदरा. या दोन्ही जागांवर विजय मिळवल्यावर त्यांनी वडोदऱ्याची जागा सोडली होती. त्यांना येथून तब्बल ५ लाख ७० हजार मतांनी विजय मिळाला होता. पोटनिवडणुकीत भाजपच्याच रंजनाबेन भट्ट साडेतीन लाख मतांनी विजयी झाल्या.
आता तरूण उमेदवार
आताच्या निवडणुकीत भाजपने नवा चेहरा जोशी यांच्या रूपाने दिला आहे. वास्तविक २०१९ च्या निवडणुकीतही रंजनाबेन विजयी झाल्या होत्या आणि त्यांचा विजय मोदींच्या विजयापेक्षाही मोठा होता. त्या तब्बल ५ लाख ८० हजार मतांनी विजयी झाल्या असूनही २०२४ मध्ये भाजपने उमेदवार बदलला. हेमांग जोशी गुजरातमधील सगळ्यांत तरूण उमेदवार आहेत.
तीन वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले. पक्षाच्या शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. नगरपालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजीचे क्लासेस सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. फिजियोथेरपीस्ट असलेल्या हेमांग यांनी पीएचडी केली आहे. एका खासगी कंपनीत ते एचआर मॅनेजर म्हणून काम करत होते. तिकिट मिळण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.