महिलांच्या फुगड्या : बालेवाडी क्रीडा संकुलाबाहेर विजयाचा आनंदोत्सव उत्सव
पिंपरी – भाजप-शिवसेना युतीचे भोसरी मतदारसंघातील उमेदवार आमदार महेश लांडगे यांचा विजय निश्चित होताच गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण करून एकच जल्लोष सुरू केला. तर, पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे कळताच दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कार्यकर्त्यांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण सुरू केली. तर, चिंचवड मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार तथा आमदार लक्ष्मण जगताप यांचा विजय दृष्टीपथात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण केली. तसेच, महिलांनी फुगड्या खेळल्या.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही मतदारसंघासाठी आज मतमोजणी झाली. मतमोजणीतून फेरीनिहाय निकाल जसेजसे समोर येत होते तसेतसे कार्यकर्त्यांचा उत्साह, उत्कंठा ताणली जात होती. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळाने फेरीनिहाय निकाल येण्यास सुरुवात झाली. निकाल ऐकण्यासाठी क्रीडा संकुलाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली होती. प्रत्येक फेरीअखेर कोण उमेदवार आघाडीवर, कोण उमेदवार पिछाडीवर याची माहिती कार्यकर्ते घेत होते. ध्वनीक्षेपकावर निवडणूक निर्णय अधिकारी फेरीनिहाय निकालाची माहिती देत होते. कार्यकर्ते सोशल मीडियावर देखील निकालाचे “अपडेट’ जाणून घेत होते. तसेच कोण उमेदवार जिंकणार, कोण उमेदवार हरणार यांचे अंदाज बांधले जात होते. निकाल ऐकण्यासाठी क्रीडा संकुलाच्या बाहेर कार्यकर्त्यांना थांबण्याची व्यवस्था केलेल्या जागेत बऱ्याच कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते.
आमदारांचे आगमन आणि गळाभेट
आमदार महेश लांडगे हे विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट होताच दुपारी 12:30 च्या सुमारास मतमोजणीच्या ठिकाणी आले. कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण आणि जल्लोष करीत त्यांचे जोरदार स्वागत केले. काही कार्यकर्त्यांनी त्यांची गळाभेट घेतली. तर, काही जणांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढणे पसंत केले.
निराशेनंतर जल्लोष
राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे पुरस्कृत उमेदवार चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात फेरीनिहाय निकालामध्ये पिछाडीवर पडले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा दाटली होती. मात्र, सव्वाबाराच्या सुमारास राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघातून मतांची आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात एकच उत्साह संचारला. कार्यकर्त्यांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण सुरू केली.
“लेट पण थेट’
चिंचवड मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात मतांसाठी रस्सीखेच सुरू होती. जगतापांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे थोडे-थोडे मताधिक्य वाढत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे आमदार जगताप हे क्रीडा संकुलाच्या येथे उशिरा म्हणजे दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोहचले. तत्पूर्वीच, कार्यकर्त्यांनी पावसाच्या सरींची पर्वा न करता जल्लोष सुरू केला होता. महिलांचा उत्साह पाहण्यास मिळाला. त्यांनी फुगड्या खेळल्या. नृत्य केले. आमदार जगताप क्रीडा संकुलाच्या येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
पोलिसांचे झाले हाल
बालेवाडी क्रीडासंकुल येथे सकाळी सहापासून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. तसेच, येथील महिला स्वच्छतागृह कुलूपबंद स्थितीत होते. त्यामुळे महिला पोलिसांची चांगलीच गैरसोय झाली.