नगर – नगर-औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास येथे बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलसी कर्मचाऱ्याला आज पहाटे भरधाव टॅंकरने उडविले. या अपघातात नगर वाहतूक शाखेचे पोलीस नदीम शेख यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेंडी बायपास येथे पोलिसांतर्फे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक टॅंकर भरधाव आला. टॅंकरने बॅरिकेडिंगसह शेख यांना धडक दिली. त्यात शेख गंभीर जखमी झाले.
पुढे जाऊन हा टॅंकर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी शेख यांना नगरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन शेख यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरून मुलाणी उपस्थित होते.