नगर -दहा गुंठे जमीन खरेदी करण्यासाठी एक कोटी दहा लाख 90 हजार रुपये दिले. परंतु, जमीन नावावर करून दिली नाही. तसेच ही जमीन परस्पर दुसऱ्याला विक्री करण्यात आली. ही बाब लक्षात आल्यावर जमीन विक्री करणाऱ्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मणकेशा रुस्तुमजी हातेदारू (वय- 75 रा. शीला विहार, सावेडी) व दीपक नामदेव सावंत (रा. आकालपुरी सोसायटी, सावेडी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुलाब पांडुरंग कराळे (वय 60, रा. वाकोडी, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
मणकेशा हातेदारू याच्या मालकीची सर्व्हे क्रमांक 86 ब प्लॉट क्रमांक आठ अ मधील पाच गुंठे व सर्व्हे क्रमांक 86 ब प्लॉट क्रमांक आठ ब मधील दहा गुंठे जमीन आहे. यातील दहा गुंठे जमीन खरेदीसाठी फिर्यादी गुलाब कराळे व मणकेशा हातेदारू यांच्यामध्ये सौदा झाला. यानंतर दोघांमध्ये जिल्हा न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये रजिस्टर साठेखताची नोंदणी झाली. फिर्यादी यांनी दहा गुंठे जमिनीसाठी हातेदारू यांना एक कोटी दहा लाख 90 हजार रुपये दिले.
त्यानंतर फिर्यादी यांनी वेळोवेळी हातेदारू यांच्याकडे जमीन नावावर करून देण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र ही जमीन इतर दुसऱ्या दोघांना विक्री केल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली. पैसे देऊनही जमीन आपल्या नावावर करून न देता दुसऱ्या दोघांच्या नावावर करून दिल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करत आहेत.