पुणे, (प्रभात वृत्तसेवा) – ‘नृत्ययात्री’ संस्थेतर्फे आयोजित ‘अग्रे पश्यामी’ या नृत्यनाट्याच्या प्रभावी सादरीकरणाने रसिक भारावून गेले. पुण्यात प्रथमच करण्यात आलेल्या या नृत्यनाट्यात चेन्नईच्या ४० पेक्षा जास्त नृत्यकलाकारांचा समावेश होता.
पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात हे नृत्यनाट्य सादर झाले. श्रीविष्णूच्या कूर्म, वराह, नृसिंह, राम आणि कृष्ण या अवतारांचं वर्णन भरतनाट्यम, मोहिनी अट्टम, कुचीपुडी आणि कृष्णाट्टम कली या नृत्यशैलींच्या माध्यमातून या नृत्य नाट्यात साकारले गेले.
संस्कृत, तमिळ, मल्याळी, कानडी, तेलगू आणि मराठी अशा ६ भाषेतील निवडक रचनांना १० प्रतिभावान संगीतकारांनी दिलेले ४० वेगवेगळ्या रागमालांमधील संगीत, सुंदर रंगभूषा, वेशभूषा ही नृत्य रसिकांसाठी खास पर्वणी ठरली.
पूना संगीत सभेचे अध्यक्ष एस .सुब्रमण्यम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नृत्यरचनाकार अनिता गुहा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘नृत्ययात्री’च्या संस्थापक मेघना साबडे यांनी स्वागत केले. डॉ.किरण ठाकूर, डॉ.सुचेता भिडे – चापेकर, मनीष साबडे आदी उपस्थित होते.
या निमित्ताने शास्त्रीय नृत्याच्या इतिहासात प्रथमच ‘नारायणीयम’ हे नृत्यनाट्याच्या स्वरूपात सादर झाले.’ नारायणीयम्’ नावाच्या संस्कृत काव्यावर हे नृत्यनाट्य आधारित होते. प्रसिद्ध वक्ते,प्राचीन वैदिक ग्रंथांचे लेखक, संशोधक आणि दिग्दर्शक दुष्यंत श्रीधर यांनी या नृत्यनाट्याची संहिता तयार केली.
भरतनाट्यम नृत्य शैलीतील प्रसिद्ध गुरु अनिता गुहा यांची नृत्यसंरचना होती. संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ. राजकुमार भारती यांची संगीतरचना होती. सूत्रसंचालन आकांक्षा शिंदे यांनी केले.