पिंपरी – चिंचवड, वेताळनगर येथे टाकाऊ पदार्थांचा वापर करून 20 बाय 20 फूट आकाराची रायगडाची प्रतिकृती साकारली आहे. किल्ल्याची प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. 15 डिसेंबरपर्यंत ही प्रतिकृती पाहण्यास ठेवण्यात येणार आहे.
राजेश अडसुळ यांची या किल्ल्याची संकल्पना असून रघुराज येरंडे व ऋषिकेश परदेशी यांनी या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. या प्रतिकृतीसाठी तीनशे तेलाचे रिकामी डबे, एक ट्रॅक्टर विटांचे तुकडे, 50 रिकामी पोती,
एक ट्रॅक्टर काळी माती, शंभर किलो पीओपी, पाचशे लिटर पाणी, काळा, हिरवा व पिवळा रंग, त्याचबरोबर काव, दोन पोती लाकडाचा भुस्सा आदी साहित्याचा वापर केला आहे. रायगडावरील रोप-वे प्रमाणे येथे दाखवण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त मातीचे किल्ले बनविण्याची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. त्याच अनुषंगाने अडसुळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची नव्या पिढीला माहिती होईल, या हेतूने त्यांनी ही प्रतिकृती सादर केली आहे.
माझा मित्र ऋषिकेश व मी आतापर्यंत सिंधुदुर्ग, जंजिरा, पदमदुर्ग, विजयदुर्ग, राजगड, लोहगड, तोरणा, तिकोणा अशा अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. यासाठी आम्ही किल्ल्यांवर जाऊन बारकाईने निरीक्षण करत असतो.
– रघुराज येरंडे, गडप्रेमी