दिवाळीच्या सुटीमुळे गर्दी : मिळतोय मोठा प्रतिसाद
पुणे – पर्यटनासाठी पसंती असलेल्या माथेरान येथील मिनी ट्रेन अर्थात टॉय ट्रेन नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना डोंगराला वळसा घालत उंचावर प्रवास करण्याची पर्वणी मिळत आहे. सध्या दिवाळीच्या सुटीमुळे माथेरान येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यातच ही ट्रेन सुरू झाल्यामुळे अनोखी मेजवानी उपलब्ध झाली आहे.
पर्यटनासाठी माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांतून येथे येतात. पुण्यापासून सुमारे 125 आणि मुंबईपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे. त्याबद्दल पर्यटकांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. येथील टॉय ट्रेन लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या भीतीने आणि पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वे दरवर्षी मान्सून काळात खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनची सेवा बंद करण्यात येते. आता मात्र मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेळ आणि मार्ग
* डाऊन मार्ग : नेरळ- माथेरान
*सकाळी 7 वाजता – सकाळी 10.40 वाजता
* सकाळी 8.50 वाजता – सकाळी 11.30 वाजता
* सकाळी 10.25 वाजता – दुपारी 1.05 वाजता
अप मार्ग : माथेरान-नेरळ
* दुपारी 12.25 वाजता – दुपारी 4.30 वाजता
* दुपारी 2.45 वाजता – सायंकाळी 5.30 वाजता
* दुपारी 4 वाजता – सायंकाळी 6.40 वाजता