नागपूरप्रमाणे केली जाणार कर आकारणी : महापालिकेकडून प्रक्रिया सुरू
पुणे – महामेट्रोकडून नागपूर आणि मुंबईत तेथील महापालिकेस मिळकतकर भरला जातो. पण, पुण्यात मात्र टोलवाटोलवी केली जात आहे. पण, आता पुणे मेट्रो प्रकल्पास नागपूरप्रमाणे कर आकारणी केली जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतच्या प्रस्तावास नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेकडून मिळकतींची माहिती मागवूनही महामेट्रोकडून ती दिली जात नसल्याने कर संकलन विभागाने प्रचलित कर आकारणी धोरणानुसार (वार्षिक करपात्र मूल्यावर आधारित) कर आकारणीचा निर्णय घेतला होता. तसेच यात नागपूर महापालिकेच्या धोरणाचीही माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
शहरात मेट्रो स्थानकांचा वापर व्यावसायिक स्वरुपात सुरू झाला आहे. त्यामुळे महापालिकेने महामेट्रोला कर आकारणीबाबत पत्र पाठवत मिळकतींची माहिती मागवली होती. मात्र, ती देण्यात आली नाही. तसेच मेट्रो हा केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या संयुक्त निधीतील प्रकल्प असल्याने ही केंद्रशासनाची अंगीकृत संस्था असल्याचे सांगण्यात येत होते.
त्यानंतर महापालिकेने सर्व कागदपत्रांची तपासणी केली. तसेच मेट्रो ही केंद्रशासनाची अंगीकृत संस्था असल्याची कागदपत्रे मागवण्यात आली होती. मात्र, महामेट्रोने दिली नाहीत. त्यामुळे पालिकेने प्रचलित धोरणानुसार प्रस्ताव ठेवला होता. मात्र, महामेट्रो नागपूर तसेच मुंबईम मिळकतकर भरत असल्याचेही समोर आले आहे.
70 ते 80 कोटींचा महसूल वाढणार
नागपूरमध्ये पुण्याप्रमाणेच वार्षिक करपात्र मूल्यावर करआकारणी करण्यात येते. यात रिकाम्या जागा, निवासी वापर तसेच व्यावसायिक वापराचे दर वेगवेगळे आहेत. प्रामुख्याने स्थानके तसेच डेपोमधील बांधकामांवर ही कर आकारणी केली जाणार आहे. तसेच स्वारगेट येथे मेट्रोचे व्यावसायिक हब उभे राहत आहे. अशा स्थितीत मेट्रोला कर आकारणी झाल्यास महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षाला 70 ते 80 कोटींचा महसूल वाढणार आहे. पुणे हद्दीत महामेट्रोची सुमारे 17 स्थानके, तसेच दोन डेपो आहेत.