पिंपरी – दिव्यांग विद्यार्थांना राज्य सेवा, केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या परीक्षेकरीता उच्च शिक्षण, दिव्यांग नागरिकांना व्यावसायिक प्रशिक्षण, आणि रोजगार यासारख्या आवश्यक त्या संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. सर्व दिव्यांगांना सुविधा देता याव्यात यासाठी शहरातील दिव्यांगांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, ब्रॅड अॅम्बेसिडर सोनाली नवांगुळ, मन शक्ती प्रक्षिक्षक डॉ. दत्ता कोहिनकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, सॅडविक कंपनीचे किरण आचार्य, प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, जागृत संघटनेचे अध्यक्ष मानव कांबळे, घरकुल संस्थेच्या संगीता जोशी काळभोर, दृष्टीहिन संघाचे संतोष राऊत आदी उपस्थित होते.
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिव्यांग बांधवांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दुपारनंतरच्या सत्रात संगीत विशारद तुकाराम कुटे यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर, आभार सामाजिक कार्यकर्ते संजय गायके यांनी मानले.