मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत अत्यंत तोकडी – देवेंद्र फडणवीस

मुंबई – निसर्ग चक्रीवादळाने कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागात मोठे नुकसान केले आहे. या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने रायगड जिल्ह्याचा दौरा करून रायगडसाठी 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत अत्यंत तोकडी आहे. राज्य सरकारने यापेक्षा अधिक मदत देणे गरजेचे आहे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गतवर्षी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये महापुराचं संकंट आल्यावर भाजप सरकारने कशाप्रकारची आर्थिक मदत केली याची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी एनडीआरएफच्या स्टॅंडिंग ऑर्डरचादेखील दाखला दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाने अतोनात नुकसान झाले आहे. याशिवाय पुणे जिल्हा, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही भागालाही फटका बसला आहे. यात पीक, फळबागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ 100 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. नुकसान प्रचंड असल्याने योग्य मदत करणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गतवर्षी जेव्हा सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पूर आला होता, त्याचवेळी कोकण आणि नाशिकमध्ये देखील त्याचप्रकारचे नुकसान झाले होते. त्यावेळी आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. कारण साधारणपणे असे संकट आल्यावर एनडीआरएफच्या रेटनुसार आपण मदत देतो. तेवढेच पैसे केंद्र सरकारकडून मिळतात. राज्य सरकार अधिकच्या निधीतून देते आणि केंद्र सरकार ते पैसे परत करत असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यावेळेस स्टॅंडिंग ऑर्डरमध्ये जी नुकसान भरपाई होते ही नुकसान भरपाई कमी असते. त्यामुळे अशा परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढून एनडीआरएफपेक्षा जास्त मदत देण्यासंदर्भाचा निर्णय भाजप सरकारने घेतला होता. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की, तसेच निर्णय या संकटकाळात राज्य सरकारने घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.