भाजपनेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक

मुंबई – केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक झाला आहे. पियुष गोयल यांच्या आई आणि ज्येष्ठ भाजपनेत्या चंद्रकांता गोयल यांचे आज (6 जून) सकाळी निधन झाले आहे. त्यांचे वय वर्षे 88 होते. याबाबत स्वत: पियुष गोयल यांनी ट्विट करत माहिती दिली. त्या मांटुगा विधानसभा क्षेत्रातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

आपल्या आपुलकीने, प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी संपूर्ण जीवनभर लोकांची सेवा केली. तसेच त्यांनी मलाही लोकांची सेवा करावी अशी प्रेरणा दिली. देव त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, ॐ शांती, असे ट्‌विट पियुष गोयल यांनी केले आहे.

पियुष गोयल यांच्या ट्‌विटनंतर विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच या दु:खाच्या प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया अनेकांनी ट्‌विटरद्वारे दिली. भाजपनेत्या पूनम महाजन यांनी चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली. चंद्रकांता गोयल यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झाले. त्या विधानसभेदरम्यान भाजपचा एक मजबूत आवाज होत्या. तसेच एक प्रेमळ नेत्याही होत्या. इतकंच नव्हे तर संपूर्ण गोयल परिवार हा महाराष्ट्रासाठी सदैव एक ताकद राहिला आहे, असेही पूनम महाजन म्हणाल्या.

दरम्यान, गोयल कुटुंब हे जनसंघ आणि भाजपशी फार पूर्वीपासून जोडले गेलेले आहेत. वेद प्रकाश गोयल हे अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. पती वेद प्रकाश गोयल यांच्या निधनानंतर चंद्रकांता गोयल यांनी मांटुगा विधानसभेत तीन वेळा निवडणूक जिंकली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.