यशवंतराव गडाख : घुले-गडाख मनोमिलन मेळाव्यात “क्रांतिकारी’च्या प्रचारास प्रारंभ
नेवासा – तालुक्यातील कार्यकर्ते दहा वर्षांपासून संभ्रम अवस्थेत होते. मात्र घुले-गडाख या कुटुंबांच्या मनोमिलनाने आकाश निरप्रभ झाले असून, दोघेही मनाने एकत्र आले आहेत. तुम्ही वरुन कीर्तन अन् आतून तमाशा करू. भाजप पक्ष कार्यकर्ते प्रचाराच्या शेवटी तुमच्या मनात संशय निर्माण करतील. त्यांच्या भूलथापांना थारा देऊ नका, असे आवाहन माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केले.
घुले-गडाख मनोमिलन मेळावा व क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार माजी आ. शंकरराव गडाख यांच्या प्रचाराचा प्रारंभ कुकाणा येथे झाला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून यशवंतराव गडाख बोलत होते. माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले, माजी आ. पांडुरंग अभंग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक देसाई देशमुख, काशिनाथ नवले, नवनाथ साळुंके, विश्वास गडाख, जि. प. सदस्य सुनील गडाख आदी मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव गडाख म्हणाले, राष्ट्रवादीचा नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विशेष आभारी असून, विठ्ठलराव लंघे यांनी तालुक्याच्या हितासाठी योग्य विचार करत शकरराव गडाखांना पाठिंबा दिला. स्व. मारुतराव घुले व आम्ही दोन सहकारी कारखाने सुरू केले. त्यासाठी आमचे रक्त, घाम व अश्रू आटले. रात्र-दिवस एक केला. मुळा धरणासाठी जमिनी आपल्या गेल्या. मात्र पाणी आता बीडला जाणार असल्याने मुळा आणि ज्ञानेश्वरसाठी ऊस आणायचा कुठून?
मुळाचे पाणी मढीच्या डोंगरावर गेले. येथील लोकप्रतिनिधींनी या प्रचाराच्या काळात घोषणा करावी दोन टीएमसी पाणी खाली देणार नाही. ते तालुक्यातील पाणी, कांदा भावाबाबत बोलयाला तयार नाहीत. ते फक्त गडाख कुटुंबाला शिव्या देत आहेत. शिव्या आम्हाला नव्या नाहीत. आम्ही तालुक्याचे काय वाईट केले, असा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही एकत्र राहिले तर जिल्ह्याचे राजकारण हालवू. कोणाची हिम्मत होणार नाही तुमच्याकडे बघण्याची. संशयाला कारणे ठेवू नका. तालुक्याच्या विकाससाठी आज पुन्हा एकदा सर्व एकत्र आलेत, याचा अभिमान वाटत आहे.
शंकरराव गडाख म्हणाले, माणूस चुकतो. आत्मपरीक्षण करून माणूस पुढे जातो. घुले-गडाख घराण्याचे वितुष्ट आज संपले. आज तुम्ही पावलात जान टाकली. लढायला विश्वास आला. तालुक्याचे नंदनवन करायचे आहे.आमच्या कुटुंबाची निंदा करायची, जमीन गहाण ठेवून तालुक्यात मत मागितले. 15 लाखाला 19 एकर जमीन खरेदी करत सर्वसामान्य म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी असामान्य झाल्याचे गडाख यांनी संगितले.
माजी आ. चंद्रशेखर घुले म्हणाले, तालुक्यात आजही रस्ते, पाणी व वीज हेच मुख्य प्रश्न आहेत. विजेचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. विधानसभेत हक्काचा माणूस पाहिजे. यासाठी गडाख यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी अनेक कार्यकत्यांनी क्रांतिकारी पक्षात प्रवेश केला. आभार प्रशांत गडाख यांनी मानले.