पुणे -जिल्ह्यातील करोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी पुणे जिल्हा परिषदेच्या जवळपास 87 शाळा सुरू झाल्या आहेत, तर बारामती आणि आंबेगाव तालुक्यात एकही शाळा सुरू होऊ शकली नाही. राज्यातील इतर जिल्ह्यांतदेखील शाळा सुरू झाल्या असून, येत्या काही दिवसांत शाळांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
करोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा येत्या 15 जुलैपासूम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्याला पालकांनी सर्वेक्षणातून सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार गुरुवारपासून सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून विविध जिल्ह्यात शाळा सुरू होत असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात 87 शाळा सुरू झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे यांनी दिली.
अनेक शाळा एकूण विद्यार्थीसंख्येच्या 50 टक्के क्षमतेने सुरू झाल्या आहेत. काही शाळांमध्ये दिवसानुसार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बोलावण्यात येत आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची काळजी म्हणून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांमध्ये साबण आणि पाण्याची मुबलक सोय करण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.