लाहोर – पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अधिक प्रकरणे दाखल करण्याची अनुमती दिली आहे. सरकारी यंत्रणांच्याविरोधात विशेषतः पाकिस्तानच्या लष्कराविरोधात द्वेष पसरवण्याबद्दल इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांविरोधात ही प्रकरणे दाखल करण्यास पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांच्या मंत्रिमंडळाने ही अनुमती दिली गेली आहे.
पंजाबच्या माहीती मंत्री अझमा बुखारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली आहे. इम्रान खान हे पाकिस्तानचे मुजीबूर रेहमान बनण्याचा प्रयत्न करत आहेत. रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात इम्रान खान यांना भेटायला जाणारे देखील द्वेष पसरवण्याच्या कामात सहभागी आहेत.
पत्रकाराच्या तक्रारीवरून ब्रिटनमधील वर्तमानपत्रामध्ये लेख लिहील्याबद्दल इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात पंजाब सरकारकडून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इम्रान खान यांच्यावर अनेक प्रकरणे दाखल असून गेल्या वर्षी एप्रिलपासून ते तुरुंगातच आहेत. इम्रान खान यांच्यावर २०० खटले सध्या न्यायप्रविष्ट आहेत. निवडणूक चिन्ह नसतानाही पीटीआय पक्षाचे समर्थन असलेल्या उमेदवारांना जनतेने विजयी केले आहे. पाक जनतेने केवळ सूड घेतलेला नाही.
तर ९ मे २०२३ च्या दंगलींबाबत रचलेली कथाही अमान्य केली आहे. लष्करी संस्थांवरील हल्ल्यांच्या प्रकरणात पीटीआयच्या कार्यकर्त्यांना गोवण्यात आले आहे. जनादेश मान्य करण्याऐवजी पाक लष्कराने निवडणुकीत गैरव्यवहार केला आणि पराभूतांना सत्तेवर बसवले, असेही इम्रान यांनी म्हटले आहे.
टेलिग्राफमध्ये लिहीला होता लेख…
इम्रान खान यांनी या महिन्याच्या सुरुवातीला टेलिग्राफ या वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहीला होता. लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाक लष्कर पीटीआय पक्षाचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र पाक लष्कराला यामध्ये यश आलेले नाही. दडपशाही, छळ आणि निवडणुकीमध्ये चिन्ह वापरू न देण्याने काहीही साध्य झालेले नाही. राजकीय नेते लष्कराचे बाहुले बनले आहे, असे इम्रान यांनी या लेखात म्हटले आहे.