करोनापासून बचावासाठी विविध उपक्रम : आयुर्वेदिक काढा वाटप, स्क्रीनिंग
पिंपरी – करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक नातेवाइक अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवित आहेत. त्यामुळे करोनाबाधितांच्या मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कारासाठी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे. गेली आठवडाभरापासून सुरु केलेल्या या उपक्रमात आतापर्यंत 14 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. या उपक्रमासाठी 26 स्वयंसेवक झटत आहेत. याशिवाय करोनासोबत लढण्यासाठी सुमारे 100 स्वयंसेवकांची टीम कार्यरत आहे.
एखाद्याला करोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन केले जाते. मात्र, रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाइकांना उपस्थित राहता येत नाही. तर अनेक ठिकाणी संसर्गाच्या भीतीने नातेवाईक अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवितात. तर करोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर धार्मिक विधी होऊन अंत्यसंस्कारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक पुढे आले आहेत. महापालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, सर्व धर्मीय करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. पीपीई किट घालून हे स्वयंसेवक भोसरी निगडी, सांगवी आणि पिंपरी येथील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करत आहेत.
संघटनांच्या वतीने करोना रोखण्यासाठी सात पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या 21 आरोग्य समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. पाच ठिकाणी समितीच्या वतीने आयुर्वेदिक काढ्याचे मोफत वाटप केले जात आहे. 50 हजार नागरिकांना काढा वाटप करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यपत्रिका तयार करण्याचे काम सुरु आहे. व्यापारी व कामगारांचे ऑक्सिजन व तापमान मोजण्याबरोबरच रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट करण्यासाठीदेखील महापालिका प्रशासनाच्या सहकार्यातून स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे.
संघाच्या जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त व प्लाझ्मादानासाठीदेखील काम सुरु आहे. बाळासाहेब लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल साठे, नितीन वाटकर, भुषण सोनवणे, शेखर अहिरराव, सतीश नागरगोजे, संजय शेळके, सचिन ढोबळे, योगेश सासवडे, राजेश पिल्ले, महेश मोटवानी, निलेश देशमुख, शैलेश कुलकर्णी, संदीप जाधव कार्यरत आहेत.