कोची – केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या अर्थात सीएएच्या मुद्द्यावर कॉंग्रेस पक्षाने मौन बाळगले आहे. त्यावरून केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
देशातील सगळ्यांत जुना पक्ष असलेली कॉंग्रेस भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएससारखीच मानसिकता दर्शवते आहे असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे देशव्यापी इंडिया आघाडीत कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकत्र असले तरी केरळमध्ये ते परस्परांच्या विरोधात लढत आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते असलेले विजयन यांनी दावा केला की सुरूवातीला सीएएला विरोध करण्यात केरळची कॉंग्रेसही आमच्यासोबत होती. मात्र नंतर त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार त्यांनी माघार घेतली. आपल्या निवडणुकीच्या घोषणापात्रातही कॉंग्रेसने सीएएबद्दल काहीही भूमिका मांडलेली नाही.
अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी सीएएवर टीका केली आहे. पण कॉंग्रेसची यासंदर्भात कोणतीही स्पष्टता नाही. त्यांनी तसे काहीच केले नाही आणि भाजप व आरएसएसच्या अजेंड्याचाही विरोध केलेला नाही.
दरम्यान, ईडी, आयकर आणि अन्य केंद्रीय तपास संस्थांच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष तेंव्हाच आवाज उठवतो जेंव्हा त्यांच्या नेत्यांवर कारवाई होते असा आरोप करून विजयन म्हणाले की आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल किंवा माकपचे थॉमस आयझॅक यांच्या विरोधात जेंव्हा या संस्था कारवाई करतात तेंव्हा कॉंग्रेस गप्प राहते.
केजरीवालांच्या विरोधातील कारवाई तर कॉंग्रेसने दाखल केलेल्या एफआयआरनंतरच झाली या आपल्या आरोपाचाही विजयन यांनी पुनरूच्चार केला. तसेच थॉमस आयझॅक यांना अटक का होत नाही याबद्दल कॉंग्रेसच सातत्याने प्रश्न विचारत होती याकडे त्यांनी लक्ष वेधले.