पिंपरी – रावेत येथील मेट्रो इको पार्क येथील इव्हीएम मशीन गोडाऊनचे बांधकामास सुरवात केली आहे. या पार्कमधील झाडांची योग्य प्रकारे काळजी घ्यावी. तसेच, वृक्ष प्राधिकरणाची पूर्व परवानगी न घेता वृक्षतोड करू नये, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने जिल्हाधिकार्यांना दिले आहे. तसेच या पूर्वीही जमीनीचा बनावट पंचनामा केल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला होता.
‘इको पार्क’ तयार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने रावेत येथील ५ एकर जमीन मेट्रोला हस्तांतरित केली होती. मात्र, यात जमीन पडीक व मोकळी असल्याचा बनावट पंचनामा तयार केल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला होता. याच पंचनामाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी सदरची जागा निवडणूक आयोगाला हस्तांतरित केली. बांधकामादरम्यान झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी पर्यावरण प्रेमी व स्थानिक रहिवासी विकास बडोलीया यांनी अॅड. विकास शिंदे व अॅड. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यामार्फत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने जिल्हाधिकार्यांना झाडांची काळजी घेण्याचा आदेश दिले आहेत.
संबंधित जागेवर ईव्हीएम मशीन गोडाऊनचे बांधकाम सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली. तसेच मागील २ महिन्यांपासून पार्क सील करुन पार्कमधील झाडांना पाणी देणे, त्यांची काळजी घेणे बंद केले होते. तसेच बांधकामासाठी पार्कमधील इतरही वृक्ष बेकायदेशीरपणे तोडले जाण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव घेतली. त्यावर राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने जिल्हाधिकार्यांना झाडांची काळजी घेण्याचा आदेश दिले आहेत.
मेट्रो इको पार्कची निर्मिती
पुण्यामध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागली. त्याची भरपाई म्हणून काही भागांमध्ये मेट्रोकडून ‘मेट्रो इको पार्क’ तयार करण्यात आले आहेत. २०१६ मध्ये ‘इको पार्क’ तयार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने रावेत येथील सर्वे नंबर १९२ व १९४ ही ५ एकर जमीन मेट्रोला हस्तांतरित केली होती. त्यानुसार मेट्रोने वृक्षलागवड केली. ‘इको पार्क’साठी आवश्यक सर्व बाबी मेट्रो व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने पूर्ण करण्यात आल्या. काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोने पार्क महापालिकेकडे २ जानेवारी २०२३ रोजी हस्तांतरित केला. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाला ईव्हीएम मशीनचे गोडाऊन बनवण्यासाठी जागेची आवश्यकता होती. त्यानुसार राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यामध्ये सदरच्या ‘मेट्रो इको पार्क’ ची जागा निवडणूक आयोगाला गोडाऊन बांधण्यासाठी हस्तांतरित केली.
काम थांबविण्याचे महापालिकेचे पत्र
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून सदरचे काम थांबविण्यास सांगितले आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे, सदरचे बांधकाम हे परस्पर सुरू केले आहे. तसेच संबंधित तक्रारदारांनी राष्ट्रपती कार्यालयाकडे दाद मागितली आहे. त्यामुळे हे काम थांबवावे. योग्य ती परवानगी घेऊन कार्यवाही करावी व बांधकाम परवानगी घ्यावी.
पार्कमध्ये विविधप्रकारची झाडे लावणे, त्यांची काळजी घेणे, नियमित पाणी दिले जात होते. तेथे विविध प्रकारची झाडे असल्याने विविध पक्ष्यांचा वावर वाढला होता.तरीही त्याचा पंचनामा करताना जमीन पडीक व मोकळी असल्याचा केला आहे. तसेच पार्क सील केल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून झाडांना पाणी मिळत नव्हते. मध्यंतरी पाऊस झाल्याने झाडांना काही प्रमाणात पाणी मिळाले. मात्र, त्यांची योग्य प्रकारे दखल घेणे गरजेचे आहे.
विकास बडोलीया, वृक्षप्रेमी.