पुणे – टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम नामदेव सुपे यांच्या घरझडतीचा तपशील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केला आहे. यामध्ये १४७ तोळे सोन्याच्या दागिन्यांबरोबरच रिव्हॉल्वर आणि काडतूसेही सापडली आहेत. त्यांच्याकडे आता एकूण साडेसात कोटी रुपयांची मालमत्ता आढळली आहे.
या प्रकरणात तुकाराम नामदेव सुपे (५९, रा. पिंपळे गुरव) यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तर, सांगवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपे याने १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत केलेल्या गैरव्यवहारांचे परीक्षण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
२०२१ मधील टीईटीतील गैरव्यवहार प्रकरणात सुपे याच्याकडून २ कोटी ८७ लाख ९९ हजार ५९० ही रोकड आणि ७२ लाख रुपये किंमतीचे १४७ तोळे सोने असा मिळून तीन कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुपे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून कार्यरत होता. त्यावेळी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यावेळी त्यांनी जमवलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने मिळवल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्याच्या नोकरी काळात वैध उत्पन्नापेक्षा अधिक रक्कम असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अनेक ठिकाणी संपत्ती…
सुपे याच्या इतर मालमत्तांमध्ये पिंपळे गुरवमधील चार मजली इमारत, आणखी एक तीन मजली इमारत, भोसरी येथे चार मजली इमारत, नाशिक आणि कल्याण येथे सदनिका, ठाणे आणि जुन्नर येथे पाच ठिकाणी प्लाॅट, महिंद्रा कार, ट्रॅक्टर आणि दोन स्कुटर आदी संपत्तीचा समावेश आहे. या प्रकारे आणखी ३ कोटी ९५लाख ३५ हजाराची मालमत्ता त्यांच्याकडे मिळून आली आहे. त्यांच्या मालमत्तेसंदर्भात आणखी काही माहिती असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.