IPL 2024 (SRH vs LSG Match 57) : आयपीएलच्या 57 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवानंतर संघाचे मालक संजीव गोयंका कर्णधार लोकेश राहुल आणि प्रशिक्षक जस्टिन लँगरवर प्रचंड भडकलेले दिसले. याप्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते राहुलची बाजू घेताना दिसत आहेत.
हैदराबादमध्ये बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने 20 षटकांत 4 बाद 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने 9.4 षटकांत बिनबाद 167 धावा करत सहज विजय मिळवला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल संजीव गोयंकांसमोर शांतपणे उभा असल्याचा दिसत आहे. गोयंका मात्र रागाच्या भरात त्यांना काहीतरी बोलताना दिसतात. ही संपूर्ण घटना आयपीएलच्या अधिकृत प्रसारक वाहिनीवर लाईव्ह दिसली. राहुलला झापल्यानंतर गोयंका प्रशिक्षक लँगर यांच्यावरही संताप व्यक्त करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या घटनेनंतर समालोचकांनीही यावर टिप्पणी करताना, असे संभाषण ड्रेसिंग रुमच्या आतील बंद खोलीत व्हायला हवे होते, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
पराभवाचे उत्तर द्यावे लागते-राहुल
सामना संपल्यानंतर राहुलने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, जेव्हा तुम्ही हरायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. आम्ही 40-50 धावा केल्या. पॉवर प्लेमध्येही विकेट्स गमावल्या. आयुष आणि निकोलस यांनी चांगली फलंदाजी करत आम्हाला 166 धावांपर्यंत नेले. परंतू आज आमचा दिवस नव्हता. हैदराबादची फलंदाजी अत्यंत कसदार होते. ट्रेव्हिस हेड व अभिषेक शर्माने आम्हाला सामन्यात संधीच दिली नाही, असेही राहुलने यावेळी म्हटले.
सबकुच पैसा है!
आयपीएल म्हणजे केवळ पैशाचा बाजार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, खेळ म्हटले की कोणीतरी जिंकत असेल तर दुसरा हरणार हे निश्चित असते. संघ मालकांनी सामन्यानंतर थेट मैदानावर प्रवेश करण्याने किंवा स्टेडियममध्ये असण्याने खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यापेक्षा दडपणच अधिक येते. त्यात आयपीएल व्यवसायिक क्रिकेट स्पर्धा असल्याने इथे पैसाही सबकुच है! त्यामुळे, मालकाने चक्क मैदानावर प्रवेश करणे आणि सर्वांसमक्ष संघाच्या कर्णधार, प्रशिक्षकाला झापने नक्कीच क्रीडासंस्कृतीला धरून नाही.