मुंबई – एप्रिल महिन्यात किरकोळ वाहन विक्री म्हणजे वितरकांनी ग्राहकांना विकलेल्या वाहन संख्येत 27% वाढ झाली आहे. या महिन्यात 22,06,070 वाहने विकली गेली. प्रवासी वाहने, दुचाकी, तीन चाकी इत्यादी सर्वच वाहनांची विक्री या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष मनीषराज सिंघानिया यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात एकूण 17,40,649 वाहने विकली गेली होती. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात प्रवासी वाहन विक्री 16 टक्क्यांनी वाढून 3,35,123 इतकी झाली आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यात दुचाकीची विक्री तब्बल 33 टक्क्यांनी वाढून 16,43,510 युनिट एवढी झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 12,33,763 इतकी होती. गेल्या अनेक महिन्यापासून दुचाकीची विक्री वाढत नसल्याबद्दल या क्षेत्रात असमाधान व्यक्त केले जात होते. मात्र आता दुचाकीची विक्री वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
या वर्षाच्या एप्रिल महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री दोन टक्क्यांनी वाढून 90,707 युनिट एवढी झाली आहे. तर तीन चाकी वाहनांची विक्री नऊ टक्क्यांनी वाढून 80,105 युनिट झाली आहे. ट्रॅक्टरची विक्री मात्र केवळ एक टक्क्याने वाढून 56,625 एवढी झाली.
प्रवासी वाहन विक्रित 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कारण या क्षेत्रासमोरील सगळे प्रश्न आता संपुष्टात आले आहेत. प्रवासी वाहने निर्माण करणार्या कंपन्यांना कोणत्याही सुट्या भागाची टंचाई जाणवत नाही. त्यामुळे या कंपन्यांनी नवी मॉडेल बाजारात आणली आहेत. सध्या व्याजदर जास्त असूनही आणि स्पर्धा जास्त असूनही वाहन क्षेत्राची वाढ योग्य प्रकारे होत आहे. याबद्दल सिंघानिया यांनी समाधान व्यक्त केले.
125 सीसी प्रकारात अनेक नवीन मॉडेल आल्यामुळे देशभरात दुचाकीची वाहन विक्री वेगाने वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यानच्या काळामध्ये इंधनाच्या किमती स्थिर होत्या. त्यामुळेही वाहन विक्री वाढण्यास मदत झाली असल्याचे त्यांना वाटते. लग्नामुळेही बरीच वाहने विकली गेली आहे. देशातील 1,503 आरटीओ पैकी 1,360 आरटीओमधून माहिती काढून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ते म्हणाले की, निवडणुकामुळे व्यावसायिक वाहनाच्या विक्रीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.
———