महादेव बेटिंग अॅपचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. जुगार, फसवणुकीच्या कलमातंर्गत मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग अॅपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकरसह अन्य 31 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात आता अभिनेता साहिल खान अडचणीत सापडला आहे. माटुंगा पोलिसांनी 31 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केल आहे.
या प्रकरणाची एफआयआर कॉपी समोर आल्यानंतर यात अभिनेता साहिल खानचेही नाव आहे. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित आणखी एक बेटिंग अॅप चालवल्याचा आरोप आहे. खिलाडी नावाचे बेटिंग अॅप चालवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल खानवर अॅप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे. याआधी साहिल खान दुबईमध्ये ऑनलाइन बेटिंग अॅपच्या एका पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसला होता.
फिटनेस मास्टर साहिल खानवर आपल्या प्रभावाचा वापर करून सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यासाठी आणि अॅपच्या प्रचारासाठी पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर साहिलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेटिंग ॲपच्या माध्यमातून लोकांची १५ हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी अभिनेत्यावर केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनेक सट्टेबाजी आणि गेमिंग ॲप वर विविध एजन्सींनी केलेल्या कारवाईनंतर ईडीने बॉलिवूडमधील इतर अनेक कलाकारांची चौकशी केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात साहिल खानच्या अडचणी देखील वाढण्याची शक्यता आहे.