पिंपरी – ट्रकचालक आंदोलन करणार नाहीत, अशी चुकीची माहिती ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोअर कमिटीचे बाल मलकीत सिंग सांगत आहेत. सिंग यांनी आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस कोअर कमिटी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.
अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी केंद्र सरकारच्या बाजूने आपली धोरणे मांडायला सुरुवात केली आहे. अद्याप हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाही. त्यामुळे ९ जानेवारीपासून ट्रक चालकांचा कोणताही संप होणार नसल्याची खोटी माहिती सिंग यांनी माध्यमाद्वारे दिली आहे. वास्तविक सिंग हे उच्चभ्रू लोकांचे नेतृत्त्व करतात. हिट अँड रन कायद्याचा सर्वाधिक फटका गोरगरीब सर्वसामान्य ट्रक चालकांना बसणार आहे. त्यामुळे सिंग यांचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही. तरीही ते खोटे बोलून समाजाची दिशाभूल करत असतील तर, काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.
संघटना आंदोलनावर ठाम
ट्रक चालकांवर अन्याय करणारा कायदा रद्द करण्यासाठी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात आले. तसेच पंजाब येथील आंदोलनात देखील बाबा कांबळे यांनी सहभाग घेतला. तसेच देशाच्या विविध भागात दौरा करून ते 9 जानेवारीला महाराष्ट्र मध्ये येणार आहेत. विविध संघटनांशी चर्चा केली असून, चक्काजाम आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो सर्व चालक-मालक सहभागी होणार आहेत, अशी माहिती बाबा कांबळे यांनी दिली