तर पेन्शन योजना बंद करू आ. औटींचा तोल सुटला 

सुपा – विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना प्रचारात सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.प्रचार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना सलग तीन वेळा निवडून आलेल्या आ. विजय औटी यांचा तोल सुटला. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना एक जरी मत कमी पडले, तरी तुमची पेन्शनबंद केली जाईल, अशी तंबी दिली.

पारनेर 224 मतदारसंघात प्रचारादरम्यान भोयरे गांगर्डा (ता. पारनेर) येथे औटी यांनी प्रचारानिमित्त बैठक घेतली. यावेळी त्यांनी या गावात संजय गांधी निराधार योजनेचे किती प्रकरणे आहेत, असा प्रश्न केला. ग्रामस्थांनी 415 प्रकरण असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांनी त्या पैकी एक जरी मत कमी पडले, तर पेन्शन बंद केली जाईल. या योजनेचा मी अध्यक्ष असून, तुमचे सरपंच सदस्य आहेत. पूर्वी 600 रुपये होते आता ऑक्‍टोबर महिन्यापासून एक हजार रुपये केले आहेत. त्यामुळे त्याचा तुम्ही विचार करा, असा इशाराच त्यांनी दिला.

दरम्यान संजय गांधी निराधार योजना ही शासनाची योजना असून, अनाथ, अपंग, निराधार, वृद्ध, विधवा यांना अल्प उत्पन्न असताना शासकीय मानधन म्हणून मिळत आहेत. ते कोणी स्वतःच्या घरातून देत नाही. प्रकरणे मंजूर केली म्हणजे जनतेवर उपकार केले का, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

संजय गांधी निराधार योजनेचा प्रस्ताव विहीत नमुन्यामध्ये भरून आवश्‍यक कागदपत्रासह सादर केल्यानंतर तालुका समिती त्यातील परिपूर्ण प्रकरणे मंजूर करते. त्यामुळे तालुक्‍यातील एकही प्रकरण रद्द होणार नाही. कोणी स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही. त्यामुळे कोणीही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी धमकी देऊ नये. मतदार स्वाभिमानी आहेत.

दौलत गांगड, उपसरपंच, भोयरे गांगर्डा.

Leave A Reply

Your email address will not be published.