राजगुरूनगर/शेलपिंपळगाव : अजित दादा तुम्ही पार्थ पवारांना मावळ लोकसभेत उभं करा आणि आधी त्यांना मावळमधून खासदार करून दाखवा. मग खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पराभवाचे बघू आणि शिरूर लोकसभेतून दिलीप वळसे पाटील यांना उभे करा त्यांनी कोल्हे यांना खासदार करण्यात वाटा उचलला ना मग होऊन जाऊ द्या. कोल्हे विरुद्ध वळसे पाटील अशी बारी होऊ दे, मग कोण घाट मारतो हे कळेलचं, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे अजित पवार यांना दिले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. तो मोर्चा राजगुरूगरात आल्यावर झालेल्या सभेत लवांडे यांनी अजितदादांना आव्हान दिले आहे. खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, या मोर्चामध्ये भगवा पण, पंजा पण आणि घड्याळ पण आहे एकदम लाईनमध्ये आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी भाजपचा चेहरा शेतकरी विरोधी आहे हे आज त्यांनी समोर आणले. भाजप प्रदेशाध्यक्ष यांना फक्त खाणार्यांची काळजी आहे. कांद्याचा प्रश्न विचारला म्हणून केंद्र सरकारला आमचा गदारोळ वाटला आणि आमचे निलंबन झाले, पण शेतकर्यांचा हाच आवाज आता सरकारचे कानठळ्या बसवल्याशिवय राहणार नाही आता पाठीवर थाप मारून फक्त लढ म्हणा, असे त्यांनी नमूद केले.
अजितदादांनी हा मोर्चा पर्सनली घेऊ नये
अनेकदा आम्ही शेतकर्यांच्या समस्या सांगितल्या, मोर्चे काढले, आंदोलनं केली तरी सरकारला जाग येईना. कांदा निर्यात बाबतीत केंद्रानेच अडचण केलेली आहे. म्हणून खासदार डॉ. कोल्हे रस्त्यावर उतरले. अजितदादांनी हा मोर्चा पर्सनली घेऊ नये. केवळ त्यांच्या मतदारसंघातील नव्हे तर राज्यातील शेतकर्यांचा हा प्रश्न आहे. खरे तर आघाडी सरकारच्या काळात असे मोर्चे निघाले तर त्या नेत्याला बोलवून घेतले जायचे. पण आता मोर्चे काढणार्यांना टार्गेट केले जाते, असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.